Categories
Anandyatri

संस्कार

लहानपणापासून माझ्यावर माहेरी अनेक संस्कार झाले. त्या अनेक संस्कारांपैकी एक संस्कार असा होता के ताटली चाटायची नाही, खरकटे लावायचे नाही इकडे तिकडे वगैरे वगैरे. मला तर स्वतःला ताटली चाटायला खूपच आवडायची. पण उद्या सासरी गेल्यावर सासू खूप रागवेल. सासरी या गोष्टीवरून हेच तुझ्या आईवडिलांनी शिकवलं का असे ऐकावे लागेल. असे मला सुनावले जायचे.

एकूण काय तर सासरी खूप जपून राहावे लागते. सासू-सासऱ्यांचा मान ठेवावा लागतो. त्यांचे समोर नीट वागावे लागते. व कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी करायच्या नाहीत. असाच व अशा अनेक प्रकारचे संस्कार माझ्यावर झाले होते.

माझे लग्न उशिरा झाले. त्यामुळे माझ्यातील वाईट संस्कार किंवा माझ्यातील वाईट गोष्टी कशा सोडायच्या हा एक माझ्यासमोर क्लिष्ट प्रश्न होता.

सासरी गेल्यावर एकदा आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो होतो. सगळ्यांचे जेवण संपले. मी व माझे सासरे आम्हा दोघांचे जेवण थोडसं राहिल्यामुळे मागे राहिले होतो. आमचे थोडेसे जेवण शिल्लक होते. त्यावेळी सासूबाईंनी दहिभात वाढलेला होता. दही भात खाताना मला राहून राहून ताटली चाटावी असे वाटू लागले. परंतु हे वागणे म्हणजे सर्वांच्या रोषाला आमंत्रण देणे होय अशी पण मनात भीती होती. आणि म्हणून मी ताटली हाताच्या बोटांनी शांतपणे स्वच्छ करायचा प्रयत्न करत होते. एवढ्यात सासर्‍यांनी त्यांची ताटली उचलली व चाटली. बापरे मी बघतच राहिले मी बाबांना विचारले “आपल्याकडे ताटली चाटली तर चालते का?” ते म्हणाले आपल्याला वाटलं तर चाटायची? त्यात काय विशेष?

आणि अशा पद्धतीने माझ्यावर झालेला एक संस्कार पुसला गेला.

Categories
Anandyatri

माझ्या जीवनातील आनंद यात्री: माझ्या सासूबाई (रागावणं माझ्या स्वभावातच नाही)

मी पेशाने वकील. अनेक कौटुंबिक प्रकरणे मी निकालात काढलेली होती. बऱ्याच प्रकरणांमध्ये सुनेला सासूचा काहीना काहीतरी त्रास हा असायचाच. त्यामुळे एकूणच सासू ही सुनेची शत्रूच असते, हा संस्कार माझ्या मनावर झालेला होता.

माझं लग्न झाले. अनेकदा सासूशी कसे वागायचे याचे सल्ले दिल्यामुळे मला भिती नव्हती. आणि माझ्या आयुष्यात सासू नामक प्रकरण सुरू झाले. माझ्या वैचारिक विश्वातील शत्रुत न बसणारी अतिशय भाबडी, सरळ, गरीब वागणारी, जिला साधंसुधं सुद्धा रागं भरता येत नाही अशी बाई मला सासू म्हणून लाभली.

आमच्याकडे एक कामाला रूक्मिणी नावाची बाई लावली होती. ती काम नीट करत नसे. मी कोर्टाच्या कामानिमित्त दिवसभर बाहेर असायचे. घरी अशी सासू. बायका पण बरोबर जोखतात मालकिणींना. मी घरी आले की पसारा तसाच असायचा. ती बाई काम करायचा आव आणायची. आज काय तिने अभंगच म्हणून दाखवला. उद्या काय तिला दुसरे अर्जंट काम आहे. अशा एक ना दोन अडचणी ठरलेल्या. शेवटी मी माझ्या सासूबाईंना सांगितले. तिला जरा नीट काम करायला सांगा. नाहीतर तिला आपण काढून टाकू. रोज मी संध्याकाळी घरी आले की त्यांना विचारायचे, ‘तिला तुम्ही ओरडलात का? ‘ त्या रोज तिला गोड शब्दांत काम करायला सांगायच्या, पण ओरडू काही शकायच्या नाहीत. मला कळेना सासूला कसे सांगावे, म्हणजे त्या, त्या बाईला ओरडतील. शेवटी एक दिवस मीच त्यांना घरातून ऑफीसला जाताना धमकावले की, ‘आज जर तुम्ही तिला कामावरून काढून टाकायची धमकी दिली नाहीत, किंवा सरळ कामावरून काढून टाकले नाहीत, तर आज तुमचे व माझे जबरदस्त भांडण होईल.’ मला माहित होते माझ्याशी भांडण करायचे सासूबाईंना जास्त टेन्शन येणार त्यामुळे आज त्या बाईला नक्कीच ओरडतील किंवा कामावरून काढून टाकतील.

संध्याकाळी मी नेहमी प्रमाणे घरी आले. आल्या आल्या सासूबाईंना विचारले, तुम्ही रूक्मिणीला बोललात की नाही?. त्या म्हणाल्या “हो, हो, बोलले तर, चांगले खडसावले”. मी त्यांना विचारले तुम्ही काय बोललात. तर त्या मला म्हणाल्या, मी तिला सांगितले, “ते तुझ्या कामावर प्रसन्न नाहीयेत”

Categories
Anandyatri

माझ्या जीवनातील आनंदयात्री

माझ्या आयुष्यात आलेल्या, अनेक व्यक्ती, माझ्यासाठी, आनंदयात्री, आनंददायी ठरलेल्या आहेत. त्या व्यक्तींची माझ्या आयुष्यातील आठवण, ही कदाचित आनंदाची असेल, दुःखाची असेल, पण प्रत्येक आठवण, ही मला आनंद देणारीच आहे. अशा माझ्या आयुष्यात आलेले जे अनेक आनंदयात्री आहेत, त्या, त्या व्यक्तींशी घडलेल्या प्रसंगांचा मला तुमच्याशी थोडा, थोडा परिचय करून देणे आवडेल.

यात तुम्हाला माझी सासू, नणंद, जाऊ, कामवाल्या, माझे अशील, मैत्रिणी, मित्र, रस्त्यातील वाटसरु असे अनेक लोक भेटतील. ज्यांमुळे मला कायम कसा आनंदच मिळाला हे मी तुम्हाला सांगणार आहे.