Site icon Kinfolk club

संस्कार

लहानपणापासून माझ्यावर माहेरी अनेक संस्कार झाले. त्या अनेक संस्कारांपैकी एक संस्कार असा होता के ताटली चाटायची नाही, खरकटे लावायचे नाही इकडे तिकडे वगैरे वगैरे. मला तर स्वतःला ताटली चाटायला खूपच आवडायची. पण उद्या सासरी गेल्यावर सासू खूप रागवेल. सासरी या गोष्टीवरून हेच तुझ्या आईवडिलांनी शिकवलं का असे ऐकावे लागेल. असे मला सुनावले जायचे.

एकूण काय तर सासरी खूप जपून राहावे लागते. सासू-सासऱ्यांचा मान ठेवावा लागतो. त्यांचे समोर नीट वागावे लागते. व कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी करायच्या नाहीत. असाच व अशा अनेक प्रकारचे संस्कार माझ्यावर झाले होते.

माझे लग्न उशिरा झाले. त्यामुळे माझ्यातील वाईट संस्कार किंवा माझ्यातील वाईट गोष्टी कशा सोडायच्या हा एक माझ्यासमोर क्लिष्ट प्रश्न होता.

सासरी गेल्यावर एकदा आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो होतो. सगळ्यांचे जेवण संपले. मी व माझे सासरे आम्हा दोघांचे जेवण थोडसं राहिल्यामुळे मागे राहिले होतो. आमचे थोडेसे जेवण शिल्लक होते. त्यावेळी सासूबाईंनी दहिभात वाढलेला होता. दही भात खाताना मला राहून राहून ताटली चाटावी असे वाटू लागले. परंतु हे वागणे म्हणजे सर्वांच्या रोषाला आमंत्रण देणे होय अशी पण मनात भीती होती. आणि म्हणून मी ताटली हाताच्या बोटांनी शांतपणे स्वच्छ करायचा प्रयत्न करत होते. एवढ्यात सासर्‍यांनी त्यांची ताटली उचलली व चाटली. बापरे मी बघतच राहिले मी बाबांना विचारले “आपल्याकडे ताटली चाटली तर चालते का?” ते म्हणाले आपल्याला वाटलं तर चाटायची? त्यात काय विशेष?

आणि अशा पद्धतीने माझ्यावर झालेला एक संस्कार पुसला गेला.

Skip to toolbar