मुलांच कुतूहल की पालकांची परीक्षा – भाग १ (उड्डाणपूलाची आणि पवनचक्कीची गोष्ट)

मी ११ वर्षांची आई आहे… अहो कसलाही गैरसमज करून घेऊ नका. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की मी ११ वर्षाच्या मुलाची आई आहे. तेही अत्यंत जिज्ञासू पण तितक्याच खोडकर मुलाची आई आहे. आज मी तुम्हाला पण माझ्या पालकत्वाच्या प्रवासामध्ये सहभागी करून घेणार आहे. असा प्रवास जो अखंड प्रश्र्न मालिकेने भरला आहे, असा प्रवास ज्यामध्ये आई मुलाच्या प्रश्र्नांची उत्तरं द्यावीत की नाही अशा संभ्रमात पडते, उत्तरं द्यायची तर कशी या विचारात पडते, असा प्रवास जो मुलाचा कुतुहलाचा झरा अखंड वाहता रहावा यासाठी केलेल्या प्रयत्नांनी भरला आहे.

माझ्या गोष्टी सांगायच्या प्रवासाला तेव्हा सुरूवात झाली जेव्हा माझा मुलगा बोलायला लागला आणि त्याने प्रश्र्न विचारयला सुरूवात केली. आधी त्याचे प्रश्र्न “आई, हे काय आहे?” “ते काय आहे?” पर्यंत सिमीत होते. मीही आपण आपल्या मुलाचं कुतूहल मारता कामा नये अशा आधुनिक विचारांची आई असल्यामुळे त्याच्या प्रश्र्नांची यथाशक्ती उत्तरं देत गेले. 

तो छोट्या मुलांसाठी असणार्या काऊ चिऊच्या गोष्टींमध्ये कधीच रमला नाही. कदाचित तो अशा गोष्टींचा त्यांच्या अनुभव विश्वाशी मेळ घालू शकत नसेल. तो त्याच्या आजूबाजूला दिसणाऱ्या सामान्य गोष्टींकडे बोट दाखवायचा आणि आई मला याची गोष्ट सांग असं म्हणायचा. त्याला प्रत्येक वस्तूची गोष्ट हवी असायची. आज मी तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे.

एकदा आम्ही कारमधून चाललो असताना त्याने बाहेर बोट दाखवलं आणि “आई, मला या उड्डाणपूलाची गोष्ट सांग” म्हणून माझ्या पाठीमागे लागला. मीही विचारात पडले की आता उड्डाणपूलाची काय गोष्ट सांगणार. मी थोडा विचार केला आणि त्याला गोष्ट सांगायला सुरुवात केली.
आपल्याला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तयार केलेल्या वाटेला रस्ता म्हणतात. जिथे दोन रस्ते एकमेकांना छेदतात अशा ठिकाणी पूल बांधून एक रस्ता दुसऱ्या रस्त्यावरून नेलेला असतो त्याला उड्डाणपूल असं म्हणतात. आणि वाहनांसाठी किंवा चालणाऱ्या लोकांसाठी एका रस्त्याखालून दुसरा रस्ता बांधतात त्याला भुयारी मार्ग म्हणतात. मग उड्डाणपूल कधी वापरतात, भुयारी मार्गाचा उपयोग काय अशी आमची गोष्ट चालू राहिली. मी या गोष्टीबद्दल साशंक होते पण गोष्ट संपली तेव्हा त्याच्या चेह-यावर मात्र समाधान दिसत होतं. 

असंच एकदा पुण्याला जात असताना आम्हाला पवनचक्की दिसली. लगेचच आमची प्रश्र्नमालिका चालू झाली.
छोटुकला: आई, हे गोल गोल काय फिरतय?

मी: अरे त्याला पवनचक्की असं म्हणतात.

छोटुकला: आई, मला त्या पवनचक्कीची गोष्ट सांग.

मी: एकदा एक टाटा काका होते. त्यांना एका टेकडीवर नेहमी जोराचा वारा वाहताना दिसायचा. त्यांनी त्या वाऱ्याचा वापर करून वीज तयार करायची ठरवली. मग काय! त्यांनी एक पवनचक्कीच उभी केली. जेव्हा जोराचा वारा वाहतो तेव्हा त्या वाऱ्यामुळे पवनचक्कीची पाती गोल गोल फिरतात. त्या पात्यामधल्या ऊर्जेच जनित्र (generator) वीजेमध्ये रुपांतर करतात. तयार झालेली वीज तारांमधून इतर ठिकाणी वाहून नेली जाते. (मी त्याला विजेच्या तारा आणि खांब दाखवले.) या तारे मधूनच वीज आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचते. आता तू सांग बरं आपल्या घरी कोणती कोणती उपकरणं विजेवर चालतात??

छोटुकला: दिवा, पंखा…

मी: अजून??

छोटुकला: अंमऽऽ फ्रीज, गिझर, मिक्सर

मी: एकदम बरोबर!!

माझी गोष्ट संपताना पिल्लूचे डोळे आनंदाने चमकत होते. मला गोष्ट सांगायच्या आधी त्याला ती समजेल की नाही अशी शंका वाटत होती. पण त्याला ती गोष्ट नुसतीच समजली नाही तर ती त्याच्या पसंतीला पण उतरली आहे हे त्याचे डोळेच सांगत होते.
काही दिवसांतच आम्ही त्याला गोष्टी सांगण्याच्या कलेमध्ये प्रभुत्व मिळवलं. अशाच प्रकारे आमच्या कितीतरी गोष्टी तयार झाल्या… खुर्चीच्या, टेबलच्या, आगगाडीच्या, क्रेनच्या, कॉंक्रीट मिक्सरच्या… या गोष्टी बहुतेक वेळेला तो पदार्थ किंवा वस्तू कशापासून बनली आहे, तिचा उपयोग कुठे होतो, ती वस्तू कशी चालते अशा मुद्यांना धरून तयार व्हायच्या.

तुम्हाला पण तुमच्या छोटुकल्यांबरोबर असे अनुभव आले असतील ना? तुमच्या पण घरामध्ये अशीच न थोपवता येणारी प्रश्र्न मालिका असेल ना?? माझी खात्री आहे की तुम्हाला तुमच्या छोटुकल्यांच्या झंझावाताला उत्तरं देताना हा लेख निश्चित मार्गदर्शक ठरेल. मलाही तुमचे अनुभव ऐकायला नक्की आवडेल. अशाच तुमच्या माझ्या जिव्हाळ्याच्या गोष्टी, अनुभव ऐकण्यासाठी माझी लेखमाला फाॅलो करा.. माझे इतर लेख (इंग्रजी आणि मराठी) वाचण्यासाठी पुढील सांकेतिक स्थळांना भेट द्या: 
https://kinfolkclub.com किंवा https://motherlab.blogspot.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: